संक्षिप्त व्यक्ति-चरित्र मालिका

स्वामी विवेकानंदांना भेटलेल्या व्यक्ति

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

मराठी ध्वनिमुद्रण ऐकण्यासाठी वरील 'प्ले' बटण दाबा

शब्दांकन: मोहिनीराज भावे

वाचन: मोहिनीराज भावे

स्वराज्य या संकल्पनेचे जनक किंवा प्रेरक भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक जहालमतवादी व्यक्तिमत्व अशी लोकमान्य टिळकांची ओळख बहुतेकांना माहीत आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ यावर्षी रत्नागिरी येथील चिखली या गावी झाला. वडील गंगाधर टिळक आणि आई पार्वतीबाई टिळक. लोकमान्यांचे वडील हे एक संस्कृत विषयातील तज्ञ आणि रत्नागिरी येथील शाळेतील शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. वडिलांची बदली झाल्यानंतर लोकमान्य टिळक आणि त्यांचा परिवार पुणे येथे वास्तव्यास आले. १८७१ मध्ये लोकमान्यांचा विवाह झाला. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार होते. खरेपणा स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्थायीभाव. 

डेक्कन कॉलेज येथून ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर टिळकांनी मुंबई येथील शासकीय कायदा विद्यापीठांमधून १८७९ मध्ये कायद्याची पदवी घेतली. कायद्याची पदवी घेतल्यानंतर टिळकांनी पुण्यामध्ये इंग्लिश आणि गणित हे विषय शिकवायला सुरुवात केली. भारतीय विद्यार्थ्यांना शिकवण्याची इंग्रजांची पद्धती याच वेळेस त्यांना खटकली. त्यांनी त्यांच्या काही मित्रांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेची भारतीय विद्यार्थ्यांसाठी भारतीय पद्धतीने ज्ञान देण्यासाठी निर्मिती केली. पुढे या संस्थेमार्फत त्यांनी शाळा कॉलेज इत्यादी स्थापून आपले कार्य आपल्या सहकाऱ्यांसमवेत पुढे नेले. 

याच काळामध्ये ब्रिटिश सत्तेविरूद्ध त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आणि भारत स्वतंत्र झाल्याशिवाय इथे विकास होऊ शकणार नाही असे त्यांना वाटू लागले. आणि याच विचारांमुळे पुढे जाऊन लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसून महत्त्वपूर्ण कार्य केले.

१८९० मध्ये टिळक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सामील झाले. स्पष्टवक्तेपणा निर्भयता या आणि अशा अनेक गुणांमुळे फारच कमी कालावधीमध्ये टिळक संपूर्ण देशामध्ये लोकांचे आवडते असे नेते झाले. अगदी ते प्रवास करत असताना सुद्धा प्रत्येक स्टेशनवर जिथे गाडी थांबेल तिथे लोक त्यांना भेटायला येत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या निमित्ताने टिळक भारतातील बऱ्याच ठिकाणी फिरले. त्याकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मुख्य कार्य मुंबई येथून चालत असे, त्यामुळे टिळक बऱ्याचदा मुंबईला जात आणि तेथून पुण्याला परतत. 

असेच एकदा म्हणजे साधारणतः सप्टेंबर १८९२ च्या सुमारास, टिळक मुंबई येथून रेल्वेने पुण्यास परत येत होते. त्यावेळच्या विक्टोरिया टर्मिनसवर म्हणजे आत्ताच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस वर त्याच वेळेस काही गुजराती लोक एका संन्यासी व्यक्तीला गाडीत बसवून देण्यास आले होते. त्या लोकांनी टिळकांची या संन्याशी व्यक्तीशी ओळख करून दिली आणि टिळक यांना विनंती केली की पुण्यामध्ये साधारण आठदहा दिवस या व्यक्तीला आपल्या घरी राहण्याची व्यवस्था करावी. टिळकांनी ही विनंती मान्य केली त्या व्यक्तीस ते आपल्या पुणे येथील विंचुरकर वाडा या घरी घेऊन आले. 

टिळकांनी लिहून ठेवलेल्या नोंदींप्रमाणे ही व्यक्ती आणि टिळक यांच्यामध्ये भगवद्गीता वेद वेदांत या विषयावर चर्चा होत असे. दोघांचेही विचार एकमेकांना पटत होते. स्वामीजी लोकांमध्ये मिसळत नव्हते त्यांच्याकडे काहीच पैसे नव्हते त्यांच्याकडे फक्त दोन कपड्याचे जोड आणि एक कमंडलू एवढेच काय ते होते. जिथे जिथे हे स्वामीजी जात होते तेथील लोक त्यांचे जाण्याचे गाडीचे भाडे तेथील राहण्याचा खर्च करीत असत. टिळकांनी लिहून ठेवलेल्या नोंदीप्रमाणे स्वामीजींना असे वाटत होते की भगवद्गीता ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे.  खरेतर याचेच प्रत्यंतर आपण टिळकांनी पुढे लिहिलेल्या गीतारहस्य या भगवद्गीतेवरील ग्रंथांमधून येते. कदाचित या विषयावरच या स्वामींचे आणि टिळकांचे एकमत झाले असावे. 

टिळकांनी याच काळातील अजून एक आठवण या स्वामीजींबद्दल लिहून ठेवली आहे ती म्हणजे त्याकाळी टिळक त्यांचे काही मित्र पुण्यातील हिराबाग भागातील एका ठिकाणी जमत तसा त्यांचा क्लब होता ज्याला डेक्कन क्लब या नावाने ओळखले जाई. स्वामीजींचे वास्तव्य टिळकांच्या घरी असताना टिळक स्वामीजींना संध्याकाळच्या वेळी या डेक्कन क्लबमध्ये आपल्याबरोबर घेऊन गेले. त्यादिवशी तिथे ज्या विषयावर चर्चा होती तो विषय मांडल्यानंतर तेथील कोणालाही त्या विषयावर नवीन काही पैलू सुचत नव्हते. कोणीतरी टिळकां बरोबर असलेल्या स्वामीजींना आपले विचार व्यक्त करण्यास सांगितले. 

टिळकांनी अशी नोंद केली आहे की या स्वामीजींनी त्यावेळेला कोणालाही सुटतील असे त्या विषयावरचे वेगवेगळे पैलू सर्वांसमोर मांडले. हे स्वामीजी फारच हुशार आहेत हे त्या वेळेस सर्वांना उमजले आणि दुसऱ्या दिवसापासून या स्वामीजींना भेटण्यासाठी टिळकांच्या घरी, विंचुरकर वाड्यामध्ये, गर्दी होऊ लागली. साधारण सात आठ दिवसाच्या मुक्कामानंतर स्वामीजींनी एक दिवस टिळकांना सांगितले की मी उद्या येथून निघेन आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी सकाळी इतर लोक उठायच्या आतच स्वामीजी तेथून निघून गेले होते.

आता हे स्वामी म्हणजे कोण हा प्रश्न अनेकांना पडला असेल तसाच तो टिळकांनाही पडला होता, कारण या स्वामींनी त्यांचे नाव टिळकांना सांगितले नव्हते. पुढे काही दिवसांनी शिकागो येथील प्रसिद्ध परिषदेनंतर स्वामी विवेकानंद यांचे नाव संपूर्ण जगाला ज्ञात झाले. त्याच वेळेस एका वर्तमानपत्रामध्ये स्वामी विवेकानंद आणि त्यांची शिकागो येथील परिषद याबद्दल छापून आले त्यासोबत त्यांचा फोटो सुद्धा छापून आला. हा फोटो लोकमान्य टिळकांनी पाहिला त्यांना असे वाटले की हे स्वामी म्हणजेच आपल्याकडे येऊन राहिलेले स्वामीजी. खात्री करून घेण्यासाठी लोकमान्य टिळकांनी स्वामी विवेकानंद यांना पत्र पाठवून अशी विचारणा केली आणि त्याला स्वामी विवेकानंद यांनी उत्तर पाठवून आपणच ते होतो असे सांगितले. 

पुढे स्वामी विवेकानंद लोकमान्य टिळक यांच्यामध्ये अजूनही काही पत्रव्यवहार झाला आहे. लोकमान्य टिळकांच्या नोंदींप्रमाणे ब्रिटीश पोलिसांनी टिळकांना अटक करताना त्यांच्या घराची झडती घेतली आणि त्यावेळेस बरीच कागदपत्रे महत्त्वाची पत्रे गहाळ झाली त्यात लोकमान्य टिळक स्वामी विवेकानंद यांच्यामधील पत्रव्यवहाराचे कागदपत्र सुद्धा गहाळ झाली. 

पुढे १९०१ मध्ये हे कलकत्ता येथे काँग्रेसचे अधिवेशन होते त्यावेळेस पुन्हा एकदा लोकमान्य टिळक स्वामी विवेकानंद यांची भेट झाली तसा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद यांच्यामधील विविध विषयांवर होणारा पत्रव्यवहार आज जरी उपलब्ध नसला तरी काही ठिकाणी तशा नोंदी मात्र नक्की आढळतात यामुळेच त्यांच्या भेटींच्या नक्की तारखा माहिती नसल्या तरीही त्यांच्या भेटी कधी झाल्या याचा अंदाज आपल्याला घेता येतो. 

पुढे टिळकांनी स्वातंत्र्यासाठी बरेच कार्य केले तसेच गीतारहस्य गणेशोत्सव इत्यादी धार्मिक कार्यामधून सुद्धा त्यांनी समाज एकत्र ठेवण्याचे कार्य केले. ऑगस्ट १९२० या दिवशी लोकमान्य टिळकांचे देहावसान झाले. अनेक भारतीयांच्या मनामध्ये घर निर्माण करणारे ते खरे लोकमान्य होते आणि म्हणूनच ते लोकमान्य या नावाने अजरामर झाले.

Disclaimer:
The materials presented on this website such as text, audio, video and other, are based on the compilation of information, gathered from various sources. The sources include books, ebooks, internet site, etc. We neigher claim any copyright on the perticulars of the information, nor can take any responsibily for the correctness of it. However, we are taking our best efforts, to present the information as accurate as possible. If you find any incorrectness in it, kindly do let us know about it. We will try our best to make all the necessory modifications.