संक्षिप्त व्यक्ति-चरित्र मालिका
स्वामी विवेकानंदांना भेटलेल्या व्यक्ति
निकोला टेस्ला
मराठी ध्वनिमुद्रण ऐकण्यासाठी वरील 'प्ले' बटण दाबा
शब्दांकन: मोहिनीराज भावे
वाचन: मोहिनीराज भावे
विज! आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंत, वेगवेगळ्या प्रकारे आपण आपले दैनंदिन व्यवहार विजेच्या साहाय्याने पूर्ण करतो. अगदी काही काळ जरी विजेशिवाय राहावे लागले तरी आपण अस्वस्थ होतो.
अगदी काही वर्षांपूर्वी, म्हणजे १८व्या शतकाच्या शेवटापर्यंत, आपण आत्ता जशी बटण दाबले की वीज मिळते, तशी मिळत नव्हती. म्हणजे सध्या आपण रोज जो वापरतो तो अल्टरनेटींग करंट (AC) त्या काळी उपलब्ध नव्हता, डायरेक्त्त करंट (DC ) उपलब्ध होता. अल्टरनेटींग करंट (AC) च्या सहाय्याने वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे सोपे झाले. तर अशा या अल्टरनेटींग करंट (AC) चा शोध ज्याने लावला तो शास्त्रज्ञ म्हणजे निकोला टेस्ला.
निकोला टेस्ला यांचा जन्म १० जुलै १८५६ मध्ये, ऑस्ट्रिया (आत्ताचे क्रोएशिया) येथे झाला. त्यांचे वडील मिलुटीन टेस्ला एक पाद्री होते. त्यांची आई डुका मेंडिस ही घरीच छोटी–मोठी उपकरणे बनवीत असे. टेस्ला यांना आईकडूनच विज्ञान आणि संशोधनाची प्रेरणा मिळाली. टेस्ला यांचे शिक्षण ऑस्ट्रिया येथे झाले. त्यानंतर १८८१ मध्ये टेस्ला बुडापेस्ट येथे गेले आणि तेथे त्यांनी बुडापेस्ट टेलिफोन एक्सचेन्ज मध्ये काही काळ, चीफ इलेक्ट्रिशिअन या पदावर नोकरी केली.
१८८२ मध्ये त्यांना पॅरिस येथील एडिसन कंपनीमध्ये नोकरी मिळाली. इथेच त्यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग चा खरा अनुभव मिळाला. तेथील मॅनेजमेंटने सुद्धा त्यांच्या इंजिनिअरिंग आणि फिजिक्समधील ज्ञानाची दखल घेऊन त्यांना जास्त कार्यक्षमतेची मोटर बनविणे आणि डिझाईन करणे या कामात सहभागी करून घेतले. पुढे १८८४ मध्ये टेस्ला यांना अमेरिकेतील एडिसन कंपनीच्या मशीन वर्क्स भागात समाविष्ट करून घेतले गेले आणि टेस्ला अमेरिकेत आले. साधारण ६ महिने त्यांनी एडिसन कंपनी मध्ये नोकरी केली आणि त्यानंतर १८८५ मध्ये त्यांनी “टेस्ला इलेक्ट्रिक लाईट अँड मॅन्युफॅक्चरिंग” ही कंपनी स्थापन केली.
“टेस्ला इलेक्ट्रिक लाईट अँड मॅन्युफॅक्चरिंग” या कंपनीच्या स्थापनेनंतर टेस्ला यांनी अनेक शोध लावले ज्यामध्ये, आर्क लाइटिंग सिस्टीम, अद्ययावत DC जनरेटर, अल्टरनेटींग करंट (AC), इंडक्शन मोटर, टेलिऑटोमेशन, हायड्रो इलेक्ट्रिक पावर प्लांट (नायगारा फॉल्स ), निऑन लॅम्प्स, रेडिओ सिग्नल ट्रान्समिशन, शॅडो ग्राफ्स (X -RAY ), टेस्ला टर्बाइन, मॅग्निफाइंग ट्रान्समीटर, टेस्ला कॉईल, इत्यादींचा उल्लेख हा करावाच लागेल. कारण या शोधांच्या रूपाने जगातील अनेक जीवनशैली बदलल्या आणि अनेक सुधारणांना प्रेरणा मिळाली. आपल्या रोजच्या वापरातील अनेक वस्तू या टेस्ला यांनी लावलेल्या शोधांच्या साहाय्याने कार्य करतात जसे की वाय फाय डिव्हाईस, वीज, X -RAY, रिमोट कंट्रोल, रूम सानिटायझर, स्मार्टफोन, निऑन लाईट, फ्लोरोसंट लाईट, लेजर बीम, कंप्यूटर, रोबोटिक्स आणि अशा बऱ्याच इतर वस्तू.
अनेक शोध लावणारा निकोला टेस्ला हा जसा एक इलेक्ट्रिकल इंजिनिअर, मेकॅनिकल इंजिनिअर होता तसाच तो वेदांताचा अभ्यासक सुद्धा होता. निकोला टेस्ला जेव्हा अमेरिकेत स्थायिक झाला त्याच सुमारास स्वामी विवेकानंद अमेरिकेत होते. हा काळ होता साधारणतः १८९६ चा. स्वामी विवेकानंद यांची अनेक ठिकाणी व्याख्याने चालू होती. ते बऱ्यापैकी लोकप्रिय झाले होते. त्यामुळे त्यांना अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळत असे.
असेच एकदा प्रसिद्ध अभिनेत्री सारा बर्नहार्ट हिच्या “इझिएल” या गौतम बुद्धांच्या आयुष्यावरील नाटकाला काही लोकांच्या आग्रहाखातर स्वामी विवेकानंद गेले. गौतम बुद्ध तसेच भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या सारा बर्नहार्ट हिने त्यांना लगेच ओळखले व त्यांच्याबरोबर एक भेट ठरविली. या भेटीच्या वेळेस काही इतर प्रसिद्ध व्यक्तीही उपस्थित होत्या ज्यामध्ये निकोला टेस्ला हे सुद्धा होते. निकोला टेस्ला आणि स्वामी विवेकानंद यांची ही पहिली भेट.
या पहिल्या भेटीत निकोला टेस्ला आणि स्वामी विवेकानंद यांची वेदांत आणि इतर विषयांवर चर्चा झाली. स्वामी विवेकानंद यांनी वेदांत अमेरिकेतील बुद्धिजीवींच्या पर्यंत पोहोचविले होते आणि त्यांची वेदान्ता मधील उत्सुकता वाढविली होती. पण वेदांताला वैज्ञानिक आधार जर सिद्ध करता आला तर खूप चांगले होईल असे त्यांना वाटे.
निकोला टेस्ला आणि त्यांची सांख्य विश्वरचना सिद्धांताच्या प्राण, आकाश आणि कल्प या तीन मूलभूत संकल्पनांवर चर्चा झाली आणि “आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत हे आकाश तत्त्व किंवा ईथर समाविष्ट आहे आणि त्यापासूनच प्राण अथवा ऊर्जा निर्माण होते” यावर दोघांचेही एकमत आहे हे त्यांना कळले. या भेटीतच टेस्ला यांनी वैज्ञानिक प्रयोगाद्वारे आपण मॅटरशी असलेला प्राचीन वैदिक संकल्पनांचा संबंध सिद्ध करू शकू असा विश्वास आपल्याला दिल्याचा उल्लेख विवेकानंदांच्या एका पत्रात आहे.
दिवसातील अगदी २ तास झोप घेणारे, कामात व्यग्र असताना जेवायचीही आठवण न राहणारे टेस्ला स्वामी विवेकानंदांच्या ‘वेदांमधील विश्वरचना’ (Vedic Cosmology) या विषयावरील अनेक व्याख्यानांना उपस्थित राहिले आणि या विषयाचा वेदांच्या दृष्टीतून गंभीरपणे अभ्यास करू लागले.
स्वामीजींना भेटल्यानंतर टेस्ला यांनी संस्कृत शब्दांचा वापर केलेला दिसून येतो. यातूनच त्यांना टेस्ला कॉईल जनरेटरची निर्मिती करण्याची प्रेरणा झाली. या संशोधनाने ‘वायरलेस ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल पावर’ या संकल्पनेचा पाया रचला. याच वर्षी ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स’ येथे दिलेल्या व्याख्यानात टेस्ला म्हणाले होते, “संपूर्ण अवकाशात एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा आहे. ही उर्जा गतिहीन आहे की गतिज आहे हा आपला प्रश्न आहे. ती गतिहीन असल्यास तिचे रूपांतर होणार नाही, त्यामुळे त्याकडून आपल्याला आशा नाहीत. मात्र ती गतिज असल्यास आज नाही तर उद्या मनुष्य तिचा योग्य वापर करेलच याबद्दल दुमत नाही.”
मॅटर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गतिज उर्जा आहे हे सिद्ध करण्यात टेलसा यांना एक दिवस यश मिळेल यावर स्वामी विवेकानंद यांचा विश्वास होता. तसेच टेलसानेसुद्धा वेदांची आणि विज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. मात्र काही कारणांमुळे टेस्ला यात अपयशी ठरले. परंतु काही काळानंतर आईनस्टाईनच्या ‘थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’द्वारे वेदांची हीच संकल्पना जगापुढे आली.
निकोला टेस्ला यांचे आयुष्य मुख्यत्वे विविध प्रकारचे प्रयोग आणि त्यातून लागलेले शोध यातच गेले. ही महत्वाची ६० वर्षे ते न्यूयॉर्क शहरात राहिले. इतके महत्वपूर्ण शोध लावल्यानंतरही आयुष्याच्या शेवटी जगाला आपल्या संशोधनाने समृद्ध करणाऱ्या या महान शास्त्रज्ञाकडे काहीच नव्हते. अतिशय गरीबी व एकाकी अवस्थेत ७ जानेवारी १९४३ ला वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
Disclaimer:
The materials presented on this website such as text, audio, video and other, are based on the compilation of information, gathered from various sources. The sources include books, ebooks, internet site, etc. We neigher claim any copyright on the perticulars of the information, nor can take any responsibily for the correctness of it. However, we are taking our best efforts, to present the information as accurate as possible. If you find any incorrectness in it, kindly do let us know about it. We will try our best to make all the necessory modifications.